जवळा ग्रामपंचायतीचे मा. सरपंच कै. साहेबरावदादा पाटील यांचे निधन – विकासाचा शिल्पकार हरपला!
जवळा ग्रामपंचायतीचे मा.सरपंच कै. साहेबरावदादा पाटील यांचे निधन – विकासाचा शिल्पकार हरपला!

✍ प्रतिनिधी
जवळा (ता. सांगोला) – जवळा ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच आणि गावाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे कै. साहेबरावदादा पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गावाने एक निष्ठावान, कर्तबगार आणि लोकभावनेला समर्पित नेतृत्व गमावले आहे.
गावच्या एकात्म विकासाचा पाया घालण्यात त्यांचा वाटा फार मोठा होता. परंतु या साऱ्या घडामोडींना दिशा देणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.आ. दीपकआबा साळुंखे पाटील. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारसरणी, राजकीय वजन आणि शासनदरबारी प्रभावामुळे जवळा ग्रामपंचायतीसाठी विकासाच्या अनेक योजना मंजूर झाल्या.
कै. दादांनी सरपंचपदाची सूत्रे हाती घेतल्यावर, दीपकआबांच्या मार्गदर्शनाखाली गावात सामूहिक नळपाणी योजना, कांक्रीट रस्ते, गटारीकरण योजना, आरोग्य केंद्र, नवीन अंगणवाडी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, रोडलाईट योजना, शाळा विकास, मंदिरे आणि बंधारे अशा विविध योजनांचे प्रभावीपणे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आली.
गावच्या प्रगतीची खरी गंगा याच काळात वाहू लागली. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळवणे, ग्रामस्थांमध्ये समन्वय साधणे, योजनांचे काटेकोर व्यवस्थापन करणे – हे सर्व काही मा.आ. दीपकआबांच्या नेतृत्त्वाखाली आणि कै. साहेबरावदादांच्या संयमी, दूरदृष्टीपूर्ण आणि प्रामाणिक नेतृत्वाखाली साकार झाले.
गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ कै. दादा यांनी सरपंचपदाची जबाबदारी पार पाडताना गावाच्या नावलौकिकात भर घातली. ते केवळ सरपंच नव्हते, तर गावाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे एक खंबीर आधारस्तंभ होते.
आषाढी एकादशीसारख्या पवित्र दिवशी, ज्या वेळी सर्व वैष्णव भाविक विठूरायाच्या भेटीसाठी पंढरपुरात एकवटले होते, त्या दिवशीच हरिनामाच्या गजरात ही दुःखद बातमी गावात पसरली आणि गावात शोककळा पसरली.
कै. दादांचे कार्य, त्यांची साधी राहणी, लोकांशी जोडलेपण आणि निष्ठेचे राजकारण यामुळे ते कायमच स्मरणात राहतील.
गावकऱ्यांच्या वतीने, तसेच मा.आ. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
“गावाच्या विकासाचा शिल्पकार हरपला, पण त्यांच्या कार्याचे तेज हे नेहमीच प्रेरणादायी राहील.”
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
️ भावपूर्ण श्रद्धांजली. ️
संपादक
प्रा.कैलास गोरे