सोलापूर

महाविकास आघाडीतील मतांचे विभाजन करण्यासाठी डॉ.जॉनी यांची उमेदवारी ; महूद येथील सभेत संजय राऊत यांची तुफान फटकेबाजी

शेतकरी कामगार पक्ष म्हणजे भाजपाची "बी" टीम

सांगोला : तालुका प्रतिनिधी

सांगोला तालुक्यातील महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभाजन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने फुस लावून डॉ. बाबासाहेब देशमुख तथा डॉ. जॉनी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. परंतु, यांना जनतेने आता चांगले ओळखले आहे. सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष म्हणजे भाजपाची “बी” टीम असल्याचा सणसणीत आरोप शिवसेना फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी केला. महूद ता. सांगोला येथे महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रबुद्धचंद्र झपके, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, साईनाथ अभंगराव, धनंजय डिकोळे, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत घाडगे, तालुकाप्रमुख अरविंद पाटील, शहरप्रमुख तुषार इंगळे काँग्रेसचे तालुकाप्रमुख अभिषेक कांबळे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगोला तालुक्यात येऊन दाखवा असे आव्हान देणाऱ्या आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. मला सांगोल्यात येण्यापासून कोणही रोखू शकत नाही. परंतु मी मनात आणले तर तुम्हाला विधानसभेत जाण्यापासून तर रोखणारच आहे पण मुंबईतही पाऊल ठेवू देणार नाही गुंडगिरी आणि भाईगिरीची भाषा माझ्यासोबत करायची नाही मी किती वेळा तुरुंगात गेलो हे मलाही आठवत नाही. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आणखी हजारवेळा तुरुंगात जायला तयार आहे. शिवसेनेचा जन्मच रस्त्यावर झाला आहे त्यामुळे रस्त्यावरची लढाई आमच्यासोबत करण्याची स्वप्न बघू नका येणारे विधानसभा निवडणुकीनंतर सांगोला तालुक्यातील गुंडगिरी आणि तालुक्यावर लागलेला गद्दारीचा डाग कायमस्वरूपी धुतला जाईल. सांगोला तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम नाही येथील मुलांची चाळीशी ओलांडली तरीही लग्न होत नाहीत आणि हे गद्दार आसाम मधील गुवाहाटीत जाऊन झाडी आणि डोंगर पाहत आहेत. सांगोला तालुक्यातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने शिवसेनेने १९९५ ते ९९ दरम्यान मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मार्गी लावला आहे. सांगोला तालुक्यावर सुरुवातीपासूनच शिवसेनेचे बारीक लक्ष आहे शिवसेनाप्रमुखांचे तर सांगोला तालुक्यावर विशेष प्रेम होते अशी आठवण करून देत गद्दार शहाजी पाटील यांनी आपले नाव बदलून घ्यावे छत्रपती शिवरायांच्या वडिलांचे नाव लावता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेशी गद्दारी करता तुम्हाला लाज कशी वाटत नाही..? असा सवाल करत तुम्हाला महाराष्ट्रातील सह्याद्रीचे डोंगर दिसले नाहीत का असा जाब विचारला आणि येणाऱ्या २३ तारखे नंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाचा चक्रवाढ व्याजांनी हिशोब घेणार आहोत असेही यावेळी खा संजय राऊत यांनी आवर्जून स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्यातील ज्वलंत प्रश्नाचा पाढाच वाचून दाखवला. सिंचनाच्या प्रत्येक योजनेत सांगोला तालुका हा टेल म्हणजे शेवटी असल्याने प्रत्येक पाळीला सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पाणी भिक मागितल्याप्रमाणे मागावे लागते. वरच्या शेतकऱ्यांची तहान भागल्याशिवाय सांगोला तालुक्याला पाणी मिळत नाही. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पाण्याचे नियोजन नसल्याने हिरावला जातो. सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमितपणे आणि सन्मानाने मिळवून देण्यासाठी तसेच सांगोला तालुक्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या हातांना काम देण्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वतंत्र एमआयडीसी उभा करून तरुणांच्या हाताला काम मिळवून देऊ आणि सांगोला तालुक्यातील अडचणीत असलेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठोस पावले उचलून पुन्हा एकदा सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणू असेही यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील मतदार आणि नागरिकांना महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी वचन दिले.

 

 आबा म्हणजे रांगडा गडी, त्यांच्यांत राज्याचे नेतृत्व करण्याची धमक..!

संपूर्ण राज्यसह सांगोला तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या शेवटच्या प्रचार सभेत खासदार संजय राऊत यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांचे कौतुक केले. दिपकआबा म्हणजे शिवसेनेत शोभणारा रांगडा गडी ते आधीच शिवसेनेत यायला पाहिजे होते. पूर्वीच ते आमदार आणि मंत्रीही झाले असते. परंतु, हरकत नाही त्यांच्यात फक्त सांगोला तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे आणि राज्याचे नेतृत्व करण्याची धमक असल्याचेही या प्रचार सभेत खासदार संजय राऊत यांनी आवर्जून सांगितले.

डॉ जॉनी यांनी सांगोल्याच्या प्रश्नावर बोलावे..!

महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा डॉ. जॉनी असा उल्लेख करत त्यांनी हवेत गप्पा न मारता सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या प्रश्नावर बोलावे त्यांच्यासमोर सांगोला तालुक्याच्या विकासाची कोणते व्हिजन आहे हे त्यांनी स्पष्ट करावे तालुक्यातील जनता त्यांच्या खोट्या फसव्या प्रचाराला बळी पडणार नाही असेही या प्रचार सभेतून खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button