यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची सोलापूर विद्यापीठात क्षेत्रभेट
पॉडकास्ट ते रेडिओ रूम… विद्यार्थ्यांनी अनुभवली पत्रकारितेची खरी दुनिया!
सांगोला (प्रतिनिधी):
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सोलापूर येथील अभ्यासकेंद्र क्रमांक ६५१३५ च्या भाई चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूरच्या सन २०२६-२७ बॅचमधील वृत्तपत्रविद्या व जनसंपर्क पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे उत्साहात पार पडली.
या क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाला भेट देत पत्रकारिता क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा जवळून पाहिल्या. विभागप्रमुख मा. अंबादास भाजके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विभागाची सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी पॉडकास्ट रूम, रेडिओ रूम, रेकॉर्डिंग रूम यांसह विविध तांत्रिक कक्षांची पाहणी करून प्रत्यक्ष अनुभव घेतला. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञानाची मौल्यवान भर पडली.
या क्षेत्रभेटीचे उत्कृष्ट नियोजन प्रा.संतोष कुलकर्णी यांनी केले होते. तसेच विषय शिक्षक प्रा.विजयकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. कैलास गोरे यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारितेबाबतची आवड वाढून त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.



