सांगोल्यात शिक्षकांचा महामेळावा; पुरस्कार वितरणासह मंगेश चिवटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी रणशिंग फुंकले
आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना पुणे विधानपरिषद विभागीय शिक्षक मतदार संघात उमेदवारी मिळण्यासाठी मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची ताकद महायुतीकडे लावणार- मा.आम.अॅड.शहाजीबापू पाटील

सांगोला, दि. 1 ऑगस्ट (प्रतिनिधी ः
सांगोला – पुणे विधानपरिषद विभागीय शिक्षक मतदार संघ शिंदे सेनेकडे यावा व मंगेश चिवटे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी मंत्र्यासह लोकप्रतिनिधीची ताकद महायुतीकडे लावली जाईल , शिक्षकांचे प्रलंबित मागण्या , जुनी पेन्शन योजना , टप्पा वाढ आदी प्रश्न आरोग्यदूत मंगेश चिवटे निश्चितच मार्गी लावतील असा विश्वास शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्यात दिला. पुणे विधान परिषद विभागीय शिक्षक मतदार संघातील अधिकृत उमेदवार आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिरात मा.आमदार अॅड.शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते झाला.
सांगोला येथे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हास्तरीय शिक्षक मेळावा, आदर्श पुरस्कार वितरण सोहळा, शिक्षक दरबार आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शहरातील राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी आदर्श संस्था, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श पत्रकार तसेच आदर्श समाजभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील 25 शैक्षणिक संस्था आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्तांचा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार केला.कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ, नगराध्यक्ष आनंदा माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, उपसभापती अजय सरगर, युवा सेनेचे सागर पाटील, युवक नेते योगेश खटकाळे, गटनेते प्रशांत धनवजीर, बांधकाम समितीचे सभापती माऊली तेली, नगरसेवक अरूण पाटील,नगरसेवक राजाभाऊ मदने, नगरसेवक चैतन्य राऊत, माजी नगराध्यक्षा राणी माने, आरोग्य सभापती गोदाबाई बनसोडे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती छायाताई मेटकरी, माजी नगरसेवक सतीश सावंत, सुरज जम्मा, प्रा. संजय देशमुख, सोमेश यावलकर, अमित पाटील, उत्कर्ष पाटील, वैभव शेटे, विशाल पाटील, वैभव बोराडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आरोग्यदूत मंगेश चिवटे हे सर्वसामान्यासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता आहे. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे ते सर्वांत विश्वासू म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. आरोग्यदूत म्हणून नावलौकिक आहे. त्यांनी महाराष्ट्रातील लाखो रूग्णांना जीवदान दिले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधीच्या माध्यमातून अनेक गोरगरीब रूग्णांना त्याचा फायदा झाला असून कोट्यावधी रूपयांचा रूग्णांना निधी वितरीत केला आहे.आरोग्य क्षेत्रात हजारो गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देत समाजसेवेचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत त्यांनी विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले असून शिक्षकांना न्याय देणारे प्रभावी प्रतिनिधित्व करण्याची क्षमता त्यांच्यात रूग्णांची अहोरात्र सेवा करणारा आरोग्यदूत आता शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुक लढविणार आहे. मंत्रालयातील गाढा अभ्यास असणारे आरोग्यदूत मंगेश चिवटे हे शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी नक्कीच सोडविणार असल्याचे मा.आमदार अॅड.शहाजीबापू पाटील यांनी नमूद केले. महायुतीतील जागावाटपात पुणे विधानपरिषद विभागीय शिक्षक मतदार संघ शिवसेनेकडे यावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील, असे त्यांनी जाहीर केले. योवळी पुणे विधानपरिषद विभागीय शिक्षक मतदार संघाबाबात मा.आम.अॅड.शहाजीबापू पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली.
यावेळी आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी शिक्षकांशी संवाद साधताना शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही दिली. शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी, टप्पावाढीचे प्रश्न सोडविण्यासाठी, वैयक्तिक मान्यता व सेवा विषयक प्रकरणे निकाली काढण्यासाठी आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न विधिमंडळात प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचे प्रश्न केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता सातत्याने शासन दरबारी मांडले जातील व ते सोडविले जातील शिक्षकांना न्याय देण्यासाठी आहोरात्र प्रयत्न करेन तसेच प्रत्येक जिल्ह्यात संपर्क कार्यालय सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटना सातत्याने लढत असल्याचे सांगितले. शिक्षकांनी संघटित राहून आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.व आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या पुणे विधानपरिषद विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी सर्व शिक्षक बांधवांनी आजपासून अहोरात्र कामाला लागावे असे सांगितले.
कार्यक्रमानंतर आयोजित ’शिक्षक दरबार’ मध्ये शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, वैयक्तिक मान्यता, शंभर टक्के अनुदानित शिक्षकांचे प्रश्न, सेवा विषयक अडचणी, रिक्त पदे, प्रशासकीय अडथळे तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध धोरणात्मक विषयांवर शिक्षकांनी आपली मते मांडली. उपस्थित अधिकार्यांनी व पदाधिकार्यांनी या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी दिले.
पुरस्कार वितरण, शिक्षक दरबार, शिक्षकांच्या प्रश्नांवरील सखोल चर्चा आणि प्रचार शुभारंभ या चारही उपक्रमांमुळे कार्यक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना व आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्यासाठी आहोरात्र काम करून त्यांना आमदार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशा भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा गुळमिरे यांनी केले, तर आभार अमित पाटील यांनी मानले.



