सोलापूर

मयत कर्जदाराच्या खात्यातील रकमेच्या कथित अपहाराचा आरोप; शेरेवाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व सचिवावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

१५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा; सहकार मंत्र्यांकडे लेखी निवेदन

सांगोला माझा आटपाडी | प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील शेरेवाडी विकास सेवा सोसायटीमध्ये मयत कर्जदाराच्या बँक खात्यातील रकमेचा कथित अपहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित चेअरमन व सचिवाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्ट २०२६ पासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा युवक नेते मच्छिंद्र बोराडे व गणेश बोराडे यांनी राज्याचे सहकार मंत्री तसेच सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनातून दिला आहे.
निवेदनानुसार, शेरेवाडी विकास सेवा सोसायटीचे कर्जदार सभासद कै. सुधीर नानासो बोराडे यांचे ६ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले. त्यांचे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दिघंची शाखेत खाते (क्र. 03805110007376) असून, ३० जून २०२५ रोजी त्यांच्या नातेवाईकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती न घेता त्या खात्यातील रक्कम शेरेवाडी विकास सेवा सोसायटीच्या नावे वर्ग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तालुका विभागीय आयुक्त व जिल्हा उपनिबंधक यांचे पत्र 
रक्कम vidral केलेलं पत्र 

या रकमेचा सोसायटीच्या चेअरमन व सचिवांनी कथितरित्या अपहार केला असून, आजतागायत ती रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा करण्यात आलेली नाही, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच, दिघंची येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेशी कथित बोगस पत्रव्यवहार करून ही रक्कम काढण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्याचबरोबर या मयत कर्जदार सभासद यांचे खात्यावरील पंतप्रधान किसान योजनेचेही पैसे शेरेवाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व सचिव यांनी हडप केलेले आहेत
याशिवाय, संबंधित व्यवहाराची कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नसल्याचा तसेच मयत कर्जदाराच्या वारसांना कोणतीही माहिती न देता संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात शेरेवाडी विकास सेवा सोसायटीच्या कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. सोसायटीमध्ये मनमानी, भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, पात्र शेतकरी असूनही त्यांना सभासदत्व नाकारले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या नियमांनुसार सोसायटीच्या कार्यक्षेत्रात शेती असलेल्या व्यक्तींना सभासद करून घेणे आवश्यक असतानाही तसे होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संदर्भात सहा जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
युवक नेते मच्छिंद्र बोराडे आणि गणेश बोराडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून न्याय दिला गेला नाही, तर १५ ऑगस्ट २०२६ पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button