आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांसाठी गावडे कॉर्नर, जवळा येथे फराळ वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात संपन्न

जवळा, ता. सांगोला | प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावडे कॉर्नर, जवळा येथे आयोजित करण्यात आलेला फराळ व उपवासाच्या अन्नपदार्थांचे मोफत वाटप हा समाजोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यंदाचे हे या उपक्रमाचे सलग पाचवे वर्ष असून, वारकरी, पंचक्रोशीतील नागरिक तसेच विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला.
‘वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा’ या उदात्त भावनेतून जवळा येथील काही युवा उद्योजक व युवक गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवत आहेत. आषाढी वारीदरम्यान हजारो वारकरी पायी प्रवास करत असताना त्यांना उपवासाचे पौष्टिक व सात्त्विक अन्न मिळावे, त्यांच्या प्रवासातील थकवा दूर व्हावा आणि सेवाभावाची परंपरा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात येतो.
या उपक्रमात गावडे कॉर्नरचे मालक विजय सरगर (पाटील), मोटिवेशनल स्पीकर पत्रकार प्रा.कैलास गोरे,कृष्णा मशिनरीचे मालक संतोष सुरवसे, आरोही एंटरप्राइजेसचे मालक विकास गावडे, माजी पंचायत समिती सदस्य मायाप्पा यमगर, युवा उद्योजक साहिल इनामदार,मेजर आगलावे, अमोल माने, श्रीकांत गावडे आणि प्रकाश आगलावे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्यासोबत लखन आगलावे, इंद्रजीत आगलावे, बुरंगे मेजर, रोहित काशीद, अमर चौधरी, प्रकाश गावडे, बालाजी चोरमुले, हमीद खलिफा, रमेश चौधरी, बापू सांगोलकर, दादा दहिवडकर, अक्षय गायकवाड, दत्ता काशीद, गणेश आगलावे, मेजर अंकुश बुरंगे, तुकाराम गावडे दत्ता गावडे उमेश
हालंगडे,युवराज माने , राजू चंदवानी,सुशांत सुरवसे,नारायण सावंत,दयानंद गावडे,शरद साळुंखे आप्पा गावडे,किरण आगलावे आणि संभाजी माळी यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सेवाकार्यात मोलाचे योगदान दिले.
विशेष म्हणजे, या उपक्रमात हिंदू–मुस्लिम बांधवांसह सर्व धर्म, जाती आणि समाजातील नागरिकांनी एकत्र येत सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि मानवतेचा सुंदर संदेश दिला. सर्वांनी कोणताही भेदभाव न ठेवता वारकऱ्यांना प्रेमाने फराळाचे वाटप केले तसेच स्वतःही या उपक्रमाचा लाभ घेत समाजात एकात्मता आणि सौहार्दाचे दर्शन घडविले.
हा उपक्रम चालू केलेल्या पहिल्या वर्षी १०० लोकांचे नियोजना पासून ते आज २००० व्यक्तिपर्यंत ही मर्यादा गेली असून पुढच्या वर्षी ही मर्यादा वाढण्याची शक्यता असल्याचे आयोजकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्था आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी अमोल माने, विकास गावडे,प्रकाश गावडे,श्रीकांत गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण उपक्रम शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडला.
वारकऱ्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानत अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात माणुसकी, सहकार्य आणि भक्तीची भावना अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. विठ्ठल-रखुमाईच्या नामस्मरणात रंगलेल्या वारकऱ्यांना या उपक्रमामुळे प्रवासात नवचैतन्य मिळाले.



धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हा संदेश देणारा हा उपक्रम सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला. भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांद्वारे वारकऱ्यांची सेवा अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.



