सोलापूर

माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी अश्विनी हॉस्पिटलमध्ये शाहीर सुभाष गोरे यांची घेतली भेट

शाहीर सुभाष गोरे यांच्या प्रकृतीची माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली विचारपूस

सोलापूर, प्रतिनिधी : सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित शाहिरी महोत्सव, हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे दिनांक 29 जुलै 2026 रोजी शाहिरी कार्यक्रम सुरू असताना शाहीर सुभाष गोरे (रा. जवळा) यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

आज, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य तथा माजी आमदार मा. दीपक आबा साळुंखे-पाटील यांनी अश्विनी हॉस्पिटलमध्ये जाऊन शाहीर सुभाष गोरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची आत्मीयतेने विचारपूस केली, उपचारांची माहिती जाणून घेतली आणि लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना मा. आम.दीपक आबा साळुंखे-पाटील म्हणाले की, “साळुंखे-पाटील आणि गोरे घराण्याचे संबंध हे पिढ्यानपिढ्यांचे आहेत. गोरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला काटा जरी टोचला, तरी त्याच्या वेदना साळुंखे कुटुंबालाही जाणवतात. हे नाते केवळ राजकीय किंवा सामाजिक नसून जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक आहे.”

या भेटीदरम्यान उपस्थितांनीही शाहीर सुभाष गोरे यांच्या प्रकृतीत होत असलेल्या सुधारण्याबद्दल समाधान व्यक्त केले. शाहीर सुभाष गोरे हे लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा आपल्या दमदार शाहिरीच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत आणि रसिकांसमोर उभे राहतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button